उस्मानाबाद : कोरोनाच्या दोन लाटा उलटून गेल्यानंतरही तिस-या लाटेच्या भितीपोटी सण-उत्सवांवर अजूनही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे जसे सर्वसामान्यांना उत्सव कुटूंबियांसोबत साजरे करावे लागत आहेत, तसेच ते लोकप्रतिनिधीनाही. एरवी सणांच्या काळात नागरिकांनी आयोजित केलेल्या सामुहिक उत्सवांमध्ये सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा देण्याची पर्वणी लोप्रतिनिधी साधत होते. मात्र, आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
खासदार ट्वीटर, फेसबुकवर ॲक्टीव्ह...
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ट्वीटरसह फेसबुकवरही चांगलेच ॲक्टीव्ह आहेत. श्रावणाचा सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच इतर सणवारांच्या शुभेच्छाही ते सध्या सोशल मीडियाच्याच माध्यमातून देत आहेत.
राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सोशल मीडियाच्या जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मसवर आहेत. ट्वीटरवर दररोज ते तुळजाभवानी मातेचे रोजच्या पूजेनंतरचे छायाचित्र अपलोड करीत असतात. शिवाय, सर्व सण-उत्सवांच्या शुभेच्छा नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत.
कैलास पाटील
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हेही सुरुवातीपासून सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहेत. अगदी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसापासून ते महापुरुषांच्या जयंती, स्मृती ते शेअर करीत असतात. याचपद्धतीने सध्या निर्बंधामुळे सणावाराच्या शुभेच्छाही ते आपल्या अकाऊंटवरुन नियमित शेअर करतात.
तानाजी सावंत
परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत हे ट्वीटरपेक्षाही फेसबुकचा जास्त वापर करताना दिसतात. या माध्यमातून ते सध्या नागरिकांना सण-उत्सवाच्या शुभेच्छा नियमित देताना दिसत आहेत. सोबतच इतर घडामोडीही ते यावर शेअर करतात.
ज्ञानराज चौगुले
उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हे नजिकच्या काळात सोशल मीडियात अधिक सक्रीय झाले आहेत. स्नेही, आप्तेष्टांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच ते सणावाराच्या शुभेच्छाही फेसबुकवरुन देत आहेत. ट्वीटरचा वापर ते फेसबुकच्या तुलनेत क्वचितच करतात.