उस्मानाबाद : गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत १४२ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यातील ९७ प्रकरणे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली होती. ३७ प्रकरणे मंजूर झाली आहेत. तर ६० प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. या योजनेची मुदत संपून १ महिन्याचा कालावधी लोटला असला, तरी अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही.
शेतात काम करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो. घरातील कर्त्या व्यक्तीस अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. या अपघातग्रस्त कुटुंबास लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. यासाठी मागील वर्षात जिल्ह्यातून १४२ प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ९७ प्रस्ताव कृषी विभागाने कंपनीकडे मंजुरीसाठी पाठविले होते. मात्र, वर्ष उलटूनही यामधील केवळ ३७ प्रस्ताव मंजूर केले आहेत. तर ६० प्रस्ताव विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहेत. यामुळे अपघातग्रस्त शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे या योजनेची मुदत ६ एप्रिल २०२२ रोजी संपली आहे. मुदत संपून सव्वा महिन्याचा कालावधी लोटला असतानाही अद्यापही योजनेस मुदतवाढ मिळालेली नाही. या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांचा ग्रेस पिरियड
या योजनेसाठी ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत एखाद्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला असेल, किंवा अपंगत्व आले असेल, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ६ एप्रिलनंतर तीन महिन्यांपर्यंत अर्ज करण्यासाठी ग्रेस पिरियड देण्यात आला आहे.
कोणाला मिळते किती मदत?
सर्पदंश, वाहन अपघात, रस्ता अपघात, वीज पडून मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत दिली जाते. तर, एक डोळा, एक हात, पाय, निकामी झाल्यास १ लाखाची मदत दिली जाते.