कळंब (जि. उस्मानाबाद) : एका हॉटेलात एक व्यक्ती जेवणाच्या टेबलावर पिस्तूल घेऊन बसला आहे, अशी खबर पोलिसांना मिळते. लागलीच काही पोलीस या हॉटेलात साध्या वेशात शिरतात. दुरूनच पिस्तुलाची खात्री करतात. खबर खरी असल्याचे पटल्यानंतर नंतर मोठा फौजफाटा तेथे दाखल होतो. व्यक्तीवर झडप घालून ती पिस्तूल ताब्यात घेतली जाते. मात्र, चाचपणी केली असता ते पिस्तूल नव्हे, तर लायटर असल्याचे स्पष्ट होते. हा डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचा प्रकार बुधवारी रात्री कळंबमध्ये घडला.
कळंब शहरातील ढोकी रोडवर असलेल्या एका हॉटेलात तिघे जण बुधवारी रात्री जेवणासाठी थांबले होते. त्यापैकी एकाकडे पिस्तूलसदृश वस्तू होती. ती त्याने जेवणाच्या टेबलावर ठेवली होती. खबऱ्याला ती खरोखरची पिस्तूल वाटल्याने त्याने तशीच खबर पोलिसांपर्यंत पोहोच केली. यानंतर लागलीच कळंब ठाण्यातील कर्मचारी सुनील हंगे, मिनाज शेख हे साध्या वेशात हॉटेलात शिरले. दुरूनच टेहळणी केली असता ती वस्तू पिस्तूलच असल्याची भासली. त्यांनी लगेचच पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना ही बाब अवगत केली. यानंतर दराडे यांनी सहायक निरीक्षक अशोक पवार, प्रशांत राऊत, गणेश वाघमोडे, शिवाजी राऊत, पठाण या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हॉटेल गाठले. संपूर्ण तयारीनिशी गेलेल्या या पोलीस पथकाने अगदी झडप घालून व्यक्तींना पकडले. पिस्तूलसदृश वस्तूसह त्यांना ठाण्यात आणले गेले. येथे चौकशी केली असता ते लायटर असल्याचे निष्पन्न झाले. एका ई-कॉमर्स कंपनीकडून हे लायटर मागवल्याचे त्या तरुणाने सांगितले. यानंतर पोलिसांनी सुस्कारा टाकला अन् ठाणे डायरीत नोंद करून त्यास सोडण्यात आले.
कोट...
आम्हाला बुधवारी रात्री गुप्त माहिती मिळाली होती. त्यास गांभीर्याने घेत प्रथम खात्रीसाठी एक पथक पाठवले. यानंतर लागलीच मागून मी व काही कर्मचारी हॉटेलवर गेलो. यावेळी पिस्तूलसारखी दिसणारी; परंतु लायटर असलेली वस्तू मिळून आली. समोरच्या व्यक्तींची चौकशी करीत, वर्तणुकीची माहिती घेऊन त्यास सोडले आहे.
-तानाजी दराडे, पोलीस निरीक्षक, कळंब