सहा महिने ते तीन वर्षे, तीन वर्षे ते सहा वर्षे, तसेच गराेदर आणि स्तनदा मातांचे आराेग्य शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे, बालकांना सकस आहार मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने एकात्मिक बालविकास सेवा याेजनेअंतर्गत पूरक पाेषण आहार दिला जाताे.
मात्र, मागील वर्षापासून काेराेना संकटाने पाठ साेडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना काेरडा शिधा दिला जात आहे. यामध्ये गहू, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, हळद, मिरची, तांदूळ आदींचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरामध्ये वेगाने वाढ हाेऊ लागली आहे.
१७० रुपये प्रति किलाेवर खाद्यतेलाचा दर पाेहाेचला आहे. खाद्यतेलाचे भडकलेले दर लक्षात घेऊन शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हे काही दिवस चालेल असे वाटत हाेते. परंतु, मागील चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना खाद्यतेलच मिळाले नाही. त्यामुळे पूरक आहाराला फाेडणी द्यायची कशी, असा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.
लाभार्थ्यांना घरपाेच आहार...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत पूर्वीच्या तुलनेत रुग्ण माेठ्या संख्येने आढळून आले. काेराेनाचे हे संकट लक्षात घेता, लाभार्थ्यांना घरपाेच पूरक पाेषण आहार देण्याचे कार्यालयाकडून नियाेजन करण्यात आले हाेते. आहाराची पाककृती एकात्मिक बालविकास सेवा याेजनेच्या आयुक्तांकडून निर्देशित आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही. तसेच काेणाच्या तक्रारीही नाहीत.
- बळीराम निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.