उस्मानाबाद : राज्यातील जवळपास १४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत़ यापैकी वर्धा, बुलढाणा, यवतमाळच्या बँकांना शासनाने सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देऊ केली़ यातून केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारी नियमित केल्या गेल्या, असे वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी उस्मानाबादेत केले़
उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची शाखा सुरु करण्यात आली आहे़ या शाखेचे उद्घाटन सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते शनिवारी झाले़ यावेळी त्यांनी सहकारातील स्वाहाकारावर भाष्य केले़ ते म्हणाले, जिल्हा बँका या चुकीच्या प्रवृत्तींमुळे अडचणीत आल्या आहेत़ मदत केली तरी कामकाजात सुधारणा होत नाही़ वर्धा, बुलढाणा, यवतमाळच्या बँकांना मदत दिल्यानंतरही त्यांनी कामकाजात फारशी सुधारणा दाखवून दिली नाही़ त्यांच्या कर्जवसुलीत आशादायक चित्र दिसत नाही़ म्हणून शासकीय मदत हा अंतिम उपाय नव्हे, असेही देशमुख म्हणाले़
कडक कायदा विचाराधीन
सहकार वाचविण्यासाठी चुकीचे वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांना १० वर्षे निवडणुका लढता येणार नाहीत, असा सहकारी कायदा केला़ मात्र, आजकाल कशावरही सहज स्टे मिळू लागला आहे़ परिणामी, या पदाधिकाऱ्यांना धाकच राहिला नाही़ ही बाब लक्षात घेता त्यांच्यात दहशत निर्माण होईल, असा कायदा शासनाच्या विचाराधीन असून, हमीभावाचा कायदाही कठोर अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुढील काळात शासनाच्या अखत्यारित दिसेल, अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली़
मागच्या भोगींनीच सहकार बुडविलासहकारात त्यागी वृत्ती असायला हवी़ मात्र, मागच्या काळात भोगाची भूमिका ठेवून सहकारात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला़ यामुळे राज्यातील सुमारे २२ हजार सहकारी संस्थांपैकी ११ हजारांवर संस्था शेवटच्या घटका मोजत असल्याचा आरोप सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला़ सहकारी संस्थेवरील विश्वास वाढविण्यासाठी स्वत: संचालकांनी ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.