कळंब : आगामी ग्रामपंचायत निवडणूक दस्तुरखुद्द ग्रामपंचायतींनाच चांगली ‘पावली’ असून, उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणाऱ्या ‘बेबाकी’ प्रमाणपत्रासाठी तालुक्यातील संभाव्य उमेदवारांनी आपल्याकडील बाकी जमा केली असल्याने तब्बल ४० लाख रुपयांच्या आसपास रकमेची ग्रामपंचायतीच्या तिजोरीत भर पडली आहे.
तालुक्यातील निवडणूक पात्र ५९ गावांतील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राबवला जात आहे. यामुळे गावगाड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकूण १८८ प्रभागांतील ४९५ जागांसाठी तगडे उमेदवार उभे करण्यासाठी सुरू असलेली पॅनलप्रमुखांची धडपड अंतिम टप्प्यात आली आहे.
यासाठी गावपातळीवर कुठे महाविकास आघाडी, तर कुठे समविचारांची मोट बांधून पॅनल तयार करण्यात आला आहे. कुठे दुरंगी तर, कुठे बहुरंगी लढती होत आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अंतिम तिथी होती. या अखेरच्या दिवसांपर्यंत ४९५ जागांसाठी विक्रमी अशा १ हजार ३५५ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
सदर उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध कागदपत्रांसह स्थानिक ग्रामपंचायतीचे कोणतेही देणे नसल्याचे ‘बेबाकी’ प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत दाखल करणे बंधनकारक होते. यामुळे एरव्ही ग्रा.पं.च्या ‘डिमांड रजिस्टर’मध्ये थकबाकी असलेला देय कर भरणा करण्याकडे कानाडोळा करणारे संभाव्य उमेदवार आपले खाते बेबाक करण्यावर भर देत होते.
यामुळे ग्रा.पं.च्या किमान त्या उमेदवारासंदर्भात तरी वसुली होत असल्याने सचिव असलेली ग्रामसेवक मंडळी समाधान व्यक्त करत होती.
तालुक्यात मागच्या पाच दिवसांत बहुतांश उमेदवारांनी आपल्या खिशात हात घालत ग्रा.पं.च्या देय रकमा चुकत्या केल्या आहेत. यातून बुधवारी दुपारपर्यंत मोठी ‘वसुली’ झाल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीत भर पडली आहे.
चौकट...
प्रमाणपत्रासाठी ठाण
४० ग्रा.पं., ३० लाखांची वसुली
बुधवारी दुपारपर्यंत विविध गावांच्या ग्रा.पं.मध्ये बेबाकी प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार व त्यांचे पुढारी ठाण मांडून बसले होते. यातून दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यातील ४० ग्रामपंचायत कार्यालयांत उमेदवारांनी तब्बल ३० लाख रुपयांचा भरणा केला होता. उर्वरित १९ ग्रामपंचायतींचा आकडा गृहीत धरला, तर ही जमा चाळीस लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
उमेदवार हवाय ना, मग तुम्हीच बाकी भरा
बेबाकी प्रमाणपत्रासाठी दखलपात्र वसुली झाल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक खुद्द ग्रा.पं.नाच पावली आहे. असे असले तरी अनेक गावांत उमेदवारांनी ‘तुम्हाला उमेदवार हवाय ना, तर माझी बाकी तुम्हीच भरा’, असा कावा केल्याने पुढाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे.
या आहेत टॉप फाइव्ह ग्रा.पं.
घरपट्टी, गाळा भाडे, भाडेकरार जागा आकारणी, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, विशेष पाणीपट्टी, सामान्य पाणीपट्टी, अशा विविध देय रकमांचा भरणा संभाव्य उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे केला आहे. यातून ईटकूर ग्रामपंचायतीकडे सर्वाधिक २ लाख ९९ हजारांची वसुली झाली आहे. याशिवाय मंगरूळ २ लाख ६५ हजार, शेलगाव एक लाख ५५ हजार, येरमाळा १ लाख ४६ हजार, तर नायगाव १ लाख २४ हजार रुपये, असा ग्रा.पं.च्या तिजोरीत भरणा झाला आहे.