लोकमत न्यूज नेटवर्क
ईट : येथील नवीन व्यापारी संकुलाच्या अनामत रकमा व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायतीकडे जमा न झाल्याने व व्यापाऱ्यांना तीनवेळा नोटीस देऊनही त्यांनी अनामत रक्कम न भरल्याने ग्रामपंचायतीने थकबाकीदारांच्या दुकानांना टाळे ठोकून दुकाने सील केली आहेत.
तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या ईट ग्रामपंचायतीने जिल्हा ग्रामविकास निधीमधून २०१९-२०मध्ये कर्ज घेऊन दोन मजली व्यापारी संकुलाचे बांधकाम केले. यामध्ये ३१ दुकाने बांधण्यात आली. त्यातील जुन्या दुकानदारांकडून दीड लाख रुपये तर नवीन व्यापाऱ्यांकडून ६ लाख, ५ लाख व ३ लाख रुपये अशी अनामत रक्कम घेण्याचे ठरले होते. त्यापैकी अनेकांकडे जवळपास ४५ लाख रुपये येणे बाकी होते. मात्र, वेळोवेळी मागणी करुनही ही रक्कम येत नसल्याने २० मार्च रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी थेट थकबाकीदार व्यापाऱ्यांच्या दुकानालाच टाळे ठोकले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीने थकबाकी भरण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सरपंच संजय आसलकर, सदस्य गणेश चव्हाण, सयाजीराजे हुंबे, काकासाहेब चव्हाण, अविनाश चव्हाण, सुनील देशमुख, सुरेंद्र बोंदार्डे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.