उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लोकसंख्येच्या तीनपट झाडे लावण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले.
वृक्षारोपणाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तालुक्याशी समन्वय ठेवता यावा, या दृष्टीने डॉ. फड यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, कुंभार, डॉ. तुबाकले, तालुका संपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता (बांधकाम) भोसले, जिल्हा जलसंधारण अधिकारी जोशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निपाणीकर, कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, कार्यकारी अभियंता देवकर आदी उपस्थित होते.
डॉ. फड म्हणाले, सद्य:स्थितीत उद्भवलेल्या कोविड परिस्थितीने रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या माध्यमातून वृक्षांची महती पुन्हा प्रकर्षाने जाणवून दिलेली आहे. या सर्व बाबी विचारात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने गावच्या लोकसंख्येच्या किमान तीनपट झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी घ्यावी. यामध्ये घन वन लागवड, गाव तेथे देवराई, रस्ता दुतर्फा लागवड, सार्वजनिक विहिरीच्या भोवती लागवड, स्मृती वन, शेताच्या बांधावर लागवड, शेतामध्ये लागवड, नदी नाले यांच्या काठावर लागवड, औषधी वनस्पतींची वने आदी प्रकारे लागवड करून उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबतही डॉ. फड यांनी निर्देश दिले.