तेर (जि. उस्मानाबाद) :उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायत निवडणूक लढवीत असलेल्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा मतमोजणी सुरू होण्याच्या काही तास आधी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. काही वेळानंतर आलेल्या निकालात उमेदवाराचाही पराभव झाला. यामुळे तेरमध्ये नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे याच गावचे. सरपंचपद व १७ सदस्यांसाठी येथे रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून सुनीता गोरे या उमेदवार होत्या. मंगळवारी सकाळी मतमोजणी होती. मतमोजणीला काही तासच बाकी असताना सकाळी ७ वाजता उमेदवार सुनीता गोरे यांचे पती रामहारी दासू गोरे (४५) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मयत रामहरी गोरे हे गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचारात मग्न होते. प्रचारादरम्यान त्यांची दगदग झाली. निकालाचा तणाव, यातूनच त्यांच्यावर हा आघात झाला असावा, असा अंदाज ग्रामस्थ बांधत आहेत. दरम्यान, उमेदवार असलेल्या सुनीता गोरे यांना त्यांच्या प्रभागातून ४२३ मते पडली. त्या अवघ्या काही मतांनी पराभूत झाल्या. गोरे कुटुंबावरील या दुहेरी आघातामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.