उस्मानाबाद तालुक्यातील धारुर ग्रामपंचायत हद्दीत शेती असलेल्या एका शेतकऱ्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेमधून विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे कामही पूर्ण झाले आहे. याअनुषंगाने संबंधित शेतकऱ्याच्या मुलाने ग्रामसेविका अमरजा मुकुंद शेखदार (४२) यांच्याकडे कुशल कामाचा २६ हजार ६६७ रुपयांचा धनादेश व यापूर्वीची शिल्लक रक्कम काढून देण्याची मागणी केली होती. मात्र, हे बिल काढून देण्यासाठी अमरजा शेखदार यांनी तक्रारदाराकडे ११ हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती १० हजार रुपये स्वीकारण्यास शेखदार यांनी मान्य केले. दरम्यान, तक्रारदाराने यासंदर्भात उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी लाचेच्या मागणीची खात्री करुन घेतली. यानंतर सापळा रचून मंगळवारी सायंकाळी तक्रारदारास ग्रामसेविकेकडे पाठवून दिले. तक्रारदाराने येथे लाचेच्या रकमेपैकी ८ हजार रुपये शेखदार यांच्याकडे देऊ केले. ही रक्कम स्वीकारताच उपाधीक्षक संपते यांच्यासह सापळ्यात सहभागी असलेले कर्मचारी दिनकर उगलमुगले, पांडुरंग डंबरे, अर्जुन मारकड, मधुकर जाधव, विष्णू बेळे, करडे यांनी आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा आरोपी अमरजा शेखदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेविकेने घेतली ८ हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:23 AM