प्रवीण खापरे संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : येथील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारी मोठ्या थाटात भव्य-दिव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेने प्रारंभ झाला. प्रारंभी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व ९२ अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले.उस्मानाबाद शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर सकाळी आठ वाजल्यापासून शहरासह परिसरातील शाळा, विद्यालयाचे विद्यार्थी विविध विशेभूषेत दाखल होत होते. येथूनच शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार असल्याने या ठिकाणी साहित्यिकांसह रसिकांनीही गर्दी केली होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. खास संमेलनासाठी तयार केलेल्या ‘शीर्षक गीता’च्या स्वरात स्वर मिसळत स्थानिक नागरिक, शाळकरी मुले, विविध धार्मिक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते ग्रंथदिंडीत सहभागी झाले. दिंडीच्या अग्रभागी ग्रंथपालखी आणि त्यापाठोपाठ साहित्याचे भोई म्हणून विख्यात साहित्यिक, रसिक होते. दरम्यान, ग्रंथदिंडी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे संमेलनस्थळी दाखल झाली. त्यानंतर ध्वजारोहण झाले.>महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभागक्रीडा संकुलातून दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले चौक, समताचौक मार्गे टीव्ही सेंटर चौकात दाखल झाली. ढोल-ताशे, स्थानिक वाद्य परंपरा सांभाळणारे घोषवादक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत गोरा कुंभार आदी महापुरूषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.
भव्य ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास थाटात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:17 AM