तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : माळरान जमिनीवर ४० गुंठे क्षेत्रात सिमला मिरचीचे १५ दिवसात चार टन उत्पादन घेत पंधरा दिवसांत तब्बल दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाडून घेण्याची किमया तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील शेतकऱ्याने साधली आहे.
धनाजी कदम यांची पिंपळा (खुर्द) शिवाराठत माळरान जमीन असून ऑगष्ट महिन्यात ४० गुंठे जमिनीत मलचिंग पेपर अंथरूण ठिबक सिंचनाचा वापर करीत त्यांनी १० हजार रोपाची लागवड केली. उत्तम पीक नियोजन करून मिरची लागवडीसह किकटनाशक, फवारणी, खत यासाठी त्यांनी दोन लाख रुपयाचा खर्च केला. ५५ दिवसानंतर मिरचीच्या रोपांना फळधारणेस सुरुवात झाली. चार तोडणीमध्ये त्यांना या चाळीस गुंठे क्षेत्रात ४ टन सिमला मिरचीचे उत्पादन निघाले.
माळरानावर उत्पादीत केलेली मिरची नागपूर बाजारपेठेत विक्रीस व्यापाऱ्यामार्फत पाठविण्यात आली असून, तेथे मिरचीस प्रति किलो ४९ ते ५१ रूपये प्रति किलो भाव मिळाला. धनाजी कदम यानी बांधावरच व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री केली केली असून, यातून १५ दिवसात तब्बल दीड लाख रूपये शेतकऱ्याच्या पदरात पडले.कोराेना काळात बाजारपेठा बंद होत्या. मात्र, आता बाजारपेठा सुरळीत चालू झाल्याने भाजीपाल्याला चांगला भाव मिळू लागला आहे. शेती व्यावसायात पीक नियोजन योग्य प्रकारे केल्यास नगदी उत्पादन पदरात मिळते हे धनाजी कदम यांनी सिध्द करून दाखविले आहे.
चार वर्षापूर्वी सोलापूर शहरालगत असलेल्या हिप्परगा तलावातून टिपरने माळरान जमिनीत गाळ भरून सुपीकता आणली. ऑगस्ट महिन्यात येथे सिमला मिरची लागवड केली. पिकाला पाण्याचा वापर ठिबकने करून पाण्याची बचत केली. यासाठी भाऊ तायाप्पा, भावजय रेखा, पत्नी मुक्ताबाई यांची साथ मिळाली. त्यामुळे १५ दिवसात दीड लाखाचे उपादन पदरात पडले.- धनाजी कदम, शेतकरी