उमरगा (जि. धाराशिव) : जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम स्वरूपाच्या पावसावर आलेली पिकेही आता करपून चालली आहे. लहान-माेठ्या प्रकल्पांतील जलसाठा चिंताजनक अवस्थेत आहेत. अक्षरश: उन्हाळ्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. आता तरी ‘वरूणराजा’ची कृपा व्हावी, यासाठी उमरगा येथील मुस्लिम जमात कमिटीच्या वतीने सलग तीन दिवस सामुहिक नमाज पठणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी इदगाह मैदानावर नमाज पठण झाले.
खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर तरी माेठा पाऊस पडेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, पावसाळ्याचे दाेन महिने सरले असतानाही पिके तगतील एवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी-नाले काेरडेठाक आहेत. तर लहान-माेठ्या प्रकल्पांतील जलसाठा चिंताजनक स्थितीत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता डाेके वर काढू लागला आहे. तर दुसरीकडे काेरडवाहू शेतातील पिके करपू लागली असून बागायत क्षेत्रातील पिकांनीही माना टाकल्या आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सध्या उन्हाळ्याप्रमाणे चित्र निर्माण झाले आहेत.
आता तरी पावसाची कृपा व्हावी, यासाठी उमरगा येथील मुस्लिम जमात कमिटीच्या वतीने ‘वरूणा’ला साकडे घालण्यासाठी सलग तीन दिवस सकाळी ७:०० वाजता सामुहिक नमाज पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार शनिवारपासून शहरातील इदगाह मैदानावर नमाज पठणास सुरूवात झाली. यावेळी जमात कमिटीचे बाबा औटी,अस्लम भाई शेख, सोहेल पठान, मदनशा मुर्शद, कलीम पठान, मौलाना अयूब, हाफिज राशिद, महताब लदाफ, निजाम वंताळे, बबलू काजी, जाहेद मूल्ला, मेहबूब बॉक्सवाले, गालिब खान, हाफिज अमजद,हाफिज फहीम,हाफिज नवाब,हाफिज समीर यांच्यासह मुस्लिम बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.