बलसूर : उमरगा तालुक्यातील कडदोरा येथे तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव व मुरुमचे मंडल कृषी अधिकारी श्याम खंडागळे यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारी, पेरणी पद्धती आणि बीज प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.
कडदोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी बीज प्रक्रिया, पेरणीची बीबीएफ पद्धत, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर, घरगुती बियाण्यांचे उत्पादन व योग्य साठवणूक, बियाण्यांची उगवण क्षमता यावर मार्गदर्शन करण्यात आले. बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जास्त आणि कमी पाऊस झाला तरी जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होतो आणि जास्त पावसात व कमी पावसात सोयाबीन तग धरून राहते. या पद्धतीने पेरणी केल्यास लागवडीचा खर्चदेखील कमी होऊन उत्पादन जास्त होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
बीज प्रक्रिया केल्याने योग्य उगवण होऊन अधिक उत्पादन मिळते. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून बीबीएफ टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करण्याचे आवाहनदेखील तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी यावेळी केले. गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यात आले. यावेळी भरत रणखांब, प्रदीप बालकुंदे, संजय रणखांब, अमोल पाटील, राजेंद्र मुगळे, अनिल माने, विठ्ठलराव पाटील, भास्कर चौधरी, सतीश देवणे, दयानंद रणखांब, शरद रणखांब, बाळू कुंभार, आदी शेतकरी उपस्थित होते.