कळंब (जि. उस्मानाबाद) : ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमानुसार, तालुक्यातील ९४ गावांत ५० कुटुंबांसाठी एक याप्रमाणे पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यात शिक्षक, अंगणवाडीताई व आशाताई या मोठी जोखीम पत्करत लोकांच्या दारांत पोहोचल्या आहेत. या उपक्रमाद्वारे पहिल्या टप्प्यात ‘गुरुजी’ अन् ‘ताईं’ची मात्र ‘भटकंती’ सुरू झाली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. यातच ट्रेसिंग, बाधितांच्या जवळचा सहवास लाभलेल्यांचा शोध घेणे गरजेचे बनले होते. मास्क, फिजिकल डिस्टन्स व दंडात्मक कारवाया याविषयीदेखील सर्वकाही बिकट स्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी प्रत्येक गावात ५० कुटुंबांसाठी प्रत्येकी एक ‘पर्यवेक्षक’ नियुक्त करावा व त्यावर निरीक्षण व कार्यवाही करण्यासाठी ‘ग्रामपालक अधिकारी’ नियुक्त करावेत, असे आदेश दिले आहेत. यानुसार, तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ९४ गावांत स्थानिक सरपंच, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी नियोजन करत प्रत्येक ५० कुटुंबांसाठी एक याप्रमाणे पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. त्यांना यासंबंधी आदेश निर्गमित करत, यामध्ये पार पाडावयाची जबाबदारी नमूद करण्यात आली आहे. यात पर्यवेक्षक मंडळींत गावातील खाजगी, जि. प. शाळेतील शिक्षक, अंगणवाडीताई, मदतनीस व आशाताई यांचा समावेश करण्यात आला आहे.
५९५ शिक्षकांच्या खांद्यावर भारग्रामीण भागात राबवला जाणारा ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रम मागच्या ४ दिवसांपासून अमलात आला आहे. यासाठी पर्यवेक्षक म्हणून तालुक्यातील खासगी व जि. प. शाळांतील ५९५ शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. सदर शिक्षकांनी आपापल्या गावात, आपल्या वाट्याला आलेल्या कुटुंबांस भेट देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आशाताई, अंगणवाडीताई व मदतनीस यांनाही पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.