कळंब: यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
कळंब तालुक्यातील ६८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पावसाने दडी मारल्याने बाधीत झाले आहे. पीक ऐन फुलोऱ्यात असताना पाण्याचा असह्य ताण सहन करावा लागला. यामुळे झालेले पिकाचे नुकसान शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडून टाकणारे ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर तालुकाभरातील शेतीशी निगडीत तरुणांनी 'शेतकरी पूत्र' या नावाने एकत्र येत कळंब येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी 'कोरडा दुष्काळ जाहीर करावा' यासह 'देत कसे नाहीत, घेतल्याशिवाय राहत नाहीत' अशा घोषणा देत अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात केले.
आंदोलकांनी यावेळी हातात रूमने, वाळलेल्या सोयाबीनचे काड हाती घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे, मंडळ अधिकारी तुळशीराम मटके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी पोनि सुरेश साबळे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता.