परंडा (जि. उस्मानाबाद) : परंडा येथील एका महिलेस चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात बुडविण्यास भाग पाडल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणात हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या तिच्या पतीसह तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस व अन्य एकावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंडा शहरालगतच्या वस्तीवर राहणाऱ्या पीडित महिलेस परंडा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी व त्याचा साथीदार हे दोघे ११ फेब्रुवारी रोजी मोटारसायकलवर बसवून परंडा-कुर्डूवाडी रोडवरील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेले. तेथे महिलेस चार दिवस डांबून ठेवून तिच्यावर त्या दोघांनी अत्याचार केला. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली. पीडित महिला घरी आल्यावर तिच्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तिला उकळत्या तेलातून पैशाचे नाणे काढण्यास भाग पाडले. यामुळे महिलेचा हात गंभीररीत्या भाजला गेला. तिच्यावर परंडा येथीलच एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केला. एवढ्यावरच न थांबता पतीने या घटनेची मोबाईलवर क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केली होती. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित महिलेस सोबत नेऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली.
त्यानुसार सोलापूर पाेलिसांनी त्याची नोंद घेऊन घटना परंडा पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा झिरोने परंडा येथे ऑनलाईन वर्ग केला. दरम्यान, या घटनेतील महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास हे उपविभागीय पोलीस आधिकारी डाॅ. विशाल खंबे हे करीत आहेत; तर अघोरी प्रथेचा पतीवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे करीत आहेत. या प्रकरणातील पीडितेचा आरोपी पती व तिच्यावर अत्याचार करणारा एक आरोपी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी पोलीस कर्मचारी अद्याप अटकेत नाही...