कळंब (जि. उस्मानाबाद) : बोगस दिव्यांग, जास्तीची टक्केवारी, शस्त्रक्रिया, गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी करावी, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी शिक्षिकांनी केली होती. या अनुषंगाने सोमवारी दोन तक्रारकर्त्या शिक्षिकांना धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. विनंती म्हणून जोडलेले हात गळ्यापर्यंत पोहोचतील, अशी धमकी दिल्याने या शिक्षिकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
जिल्हा परिषदेत कार्यरत काही शिक्षकांनी बोगस ''दाखले'' संलग्नित करीत बदलीमध्ये संवर्ग एकचा लाभ घेणे, जोडीदारास सूट व प्राधान्य, बदलीत सूट घेणे असे लाभ घेतल्याचे प्रकार बीडमध्ये समोर आले होते. या अनुषंगाने २ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्ह्यातही अशी चौकशी करण्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. यातूनच तक्रार करणाऱ्या शिक्षिकांना धमकीचे पत्र दिल्याचा कयास वर्तविला जात आहे. या प्रकाराचा शिक्षकांतून निषेध करण्यात येत आहे. कन्हेरवाडी जि. प. शाळेतील सहशिक्षिका साधना झाल्टे व हावरगाव येथील सहशिक्षिका सुनीता गायकवाड यांना पोस्टाने हे धमकीपत्र प्राप्त झाले असून, ते येरमाळा येथील संभाजी शिंदे अशा बोगस नावाने पाठविले गेले आहे. यात संबंधित शिक्षिकांच्या मुलांनाही जपण्याचा इशारा देण्यात आला आहे.