उस्मानाबाद : मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत गुरुवारी सिंदफळ येथील ग्रामस्थांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल तास भर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एका सहा वर्षीय मुलीवर ३० ऑगस्ट रोजी एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संतापलेले ग्रामस्थ गुरुवारी शहरात दाखल झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयालयावर मोर्चा काढण्यात आला. संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा थेट जिल्हाधिकार्यालयाच्या आवारात दाखल झाला. मुलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत ग्रामस्थांनी तेथेच ठिय्या मांडला.
यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तपास उपविभागीय पोलीस अधीक्षकांकडे सोपविल्याचे सांगितले, तसेच चार्जशीटही पंधरा दिवसात दाखल केली जाणार असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची न्यायालयाकडे मागणी केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीआंदोलन मागे घेतले.