उमरगा : तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी इंडिया लिटरसी मिशनअंतर्गत ‘हॅपी स्कूल’ (आनंदी शाळा) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोरेगाव शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लबचे ट्रेनर डॉ. संजय अस्वले, माजी अध्यक्ष शिवानंद दळगडे, संजीव कुलकर्णी, विक्रम आळंगेकर, उमेश चिंचोळे आदींच्या हस्ते मुख्याध्यापक प्रवीण स्वामी, शालेय समितीच्या अध्यक्षा सारिकाताई वाघमोडे, माजी अध्यक्ष मनोहर बंडगर, सरपंच संजय पाटील, उपसरपंच विश्वजित खटके, सेवा सोसायटीचे चेअरमन हणमंत वडरगे यांच्याकडे हा पुरस्कार सुपुर्द करण्यात आला. या शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. रोटरीच्या वतीनेही या उपक्रमासाठी हातभार लागल्याचे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांनी सांगितले. यावेळी सहशिक्षक अशोक बिराजदार, लक्ष्मी वाघमोडे, उमाचंद्र सूर्यवंशी यांचेही कौतुक करण्यात आले. यावेळी माउली आश्रमशाळेचे अनिल श्रीमेवार, सहशिक्षक रासलवाल यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी केले.