उमरगा तालुक्यातील तलमोड येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह ४ जून रोजी होणार असल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना समजली. संबंधित माहिती, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उमरगा तहसीलदार संजय पवार यांना कळवण्यात आली. उमरगा तालुक्यातील बलसूर येथेही ४ जून रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती उमरगा प्रशासनाला समजली हाती. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या मार्गदर्शनाने, तहसीलदार संजय पवार यांनी तत्परतेने महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड सह टीमला बलसूर आणि तलमोड येथील परिवाराला भेटी देत नियोजित विवाहाच्या दोन दिवसाआधीच परिवारांचे समुपदेशन करून लेखी स्वरूपात हमीपत्र घेतले. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्याची सखोल माहिती संबंधित परिवारातील सर्व सदस्यांना देण्यात आली. दोन्ही बालविवाह अगदी नियोजित वेळीच्या दोन दिवस अगोदर रोखण्यात यश लाभले. दरम्यान, ४ जून राेजी उस्मानाबाद येथेही एक बालविवाह हाेणार असल्याची माहिती या पथकाला ३ जून राेजी मिळाली हाेती. त्यानुसार तहसीलदार गणेश माळी यांनी तातडीने कार्यवाही केल्याने हा विवाह राेखता आला. एकूणच मागील दाेन दिवसांत तीन बालविवाह राेखण्यात प्रशासनाला यश आले.
चाैकट...
लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. स्वतःच्या मुलीला समजून घ्या तिच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करा, तिला उच्चशिक्षित बनवा, परिस्थितीचे कारण-निमित्त पुढे करत आपल्या स्वतःच्या मुलीला अंधाऱ्या खाईत ढकलू नका. मुलींच्या शिक्षणासाठी प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. मुलींचा अभिमान बाळगा.
- संजय पवार, तहसीलदार, उमरगा.