वाशी तालुक्यातील पिंपळगाव को. येथील शमा रसूल सय्यद यांच्या धश्राला कुलूप होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरात ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्या हाती लागल्यावर चोरट्यांनी घर सोडले. मात्र, जाता-जाता शमा सय्यद यांच्या घरासमोर लावलेली दुचाकीची चोरट्यांच्या नजरेत भरली. मग त्यांनी या दुचाकीकडे मोर्चा वळवून ती ही पळवून नेली. हा संपूर्ण प्रकार मंगळवारच्या पहाटे घडला. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शमा सय्यद यांनी वाशी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलसमोरुन चोरल्या दोन दुचाकी...
उस्मानाबाद : हॉटेलसमोर दुचाकी लावून कामानिमित्त गेलेल्या दोघांच्या दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या आहे. उस्मानाबाद शहरातील लक्ष्मण ब्रम्हदेव भोसले यांनी त्यांची दुचाकी रविवारी आठवडे बाजारात गेल्यानंतर तेथील एका हॉटेलसमोर लावली होती. तासाभरात त्यांनी खरेदी आटोपली व दुचाकीकडे गेले. तेव्हा तेथून दुचाकी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी मंगळवारी शहर ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सचिन कोंडिबा घोडके यांनी रविवारी गावातील एका उडपी हॉटेलसमोर दुचाकी लावली होती. ती ही चोरट्यांनी काही वेळातच गायब केली. याप्रकरणी नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध बांधकाम, एकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : पालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षाही जास्तीचे अवैध बांधकाम करुन नोटिसीकडे कानाडोळा करणाऱ्या एका नागरिकावर मंगळवारी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकार उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात घडला. उस्मानाबादच्या तांबरी विभागात राहणारे सुरेश ध्रुव तायडे यांनी बांधकामासाठी नगरपालिकेकडे अर्ज करुन परवानगी मिळवली होती. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष बांधकाम करताना पालिकेने दिलेल्या परवानगीचे उल्लंघन केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवून अवैध बांधकाम काढून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तायडे यांनी पालिकेच्या नोटिसीला कुठलेच उत्तर दिले नाही. शिवाय, काढून घेण्यास सांगितलेले बांधकामही पाडले नाही. त्यामुळे पालिकेतील अधिकारी सुनील इंगळे यांनी उस्मानाबाद शहर ठाण्यात सुरेश तायडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्याप्रमाणे मंगळवारी नगररचना कायद्याचे कलम ५३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.