धाराशिव : २०१९च्या निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली, तेव्हाच आपण यास विरोध केला होता. तरीही ऐकलं नाही. आघाडी झाली. तेव्हापासूनच सत्तांतरासाठी माझे प्रयत्न सुरू झाले. शिंदे-फडणवीस यांच्यासमवेत शंभर ते दीडशे बैठका दोन वर्षांत झाल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी परंडा येथे केला.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी सावंत हजर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्या तत्कालीन पक्षप्रमुखांना मी सांगत होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नका म्हणून. ऐकलं नाही. चांगले काम असतानाही मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. आपण त्याचवेळी पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नाही, असे सांगून बाहेर पडलो. पक्षातील पहिले बंड आपणच केले. यानंतर सलग दोन वर्षे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या आमदारांशी भेटून त्यांचे समुपदेशन करीत होतो. याच काळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत माझ्या शंभर ते दीडशे बैठका झाल्या. यानंतर हे बंड यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.
पाणी पळवण्याचे कारस्थान...
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी बारामतीकरांनी मिळू दिले नाही. कामांचा प्राधान्यक्रम बदलून हे पाणी उजनीत आणायचे अन् मग पुढची कामे झाली नाहीत, असे सांगून उजनीतील पाणी बारामतीला न्यायचा डाव होता. तोही आपण हाणून पाडल्याचा दावा सावंत यांनी केला.