उस्मानाबाद/समुद्रवाणी : उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी लागली. परंडा मंडळात मुसळधार पाऊस झाला आहे. येथे १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर १४ मंडळात अतिवृष्टी तर १ मंडळात मुसळधार पावसाची नोंद आहे. दरम्यान, उस्मानाबाद तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत चौघेजण वाहून गेले होते. यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे, तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. ( two disappeared in the floodwaters at Osmanabad )
मराठवाड्यातील १९ मंडळात अतिवृष्टी झालीय, त्यातील १५ मंडळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. पावसाअभावी पिके सुकत चाललेल्या उस्मानाबादला शुक्रवारी व शनिवारच्या रात्री मात्र पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात १४ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर परंडा शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यातही जोरदार पावसाची नोंद झाली. विशेषत: पाडोळी मंडळात १०० मिलीमीटरसह अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे पाडोळी परिसरातून वाहणार्या नद्या, ओढे दुथडी भरुन वाहत होत्या. दरम्यान, ओढ्याच्या पुरात उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव व समुद्रवाणी येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघेजण वाहून गेले आहेत. त्यांचा आपत्ती व्यवस्थापनाकडून शोध घेतला जात आहे. शिवाय, पुराचे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या समुद्रवाणी येथील एक गावकरीही पाण्यात वाहून गेला. त्याचाही शोध घेतला जात आहे. तर, शुक्रवारी रात्री उशिरा समुद्रवाणी गावातील पुलावरुन एक कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघेजण होते. दोघेजण पाण्याच्या अंदाज घेण्यासाठी खाली उतरले. तर दोघे कारमध्येच होते. कारमध्ये अडकलेल्या दोघांना गावकर्यांनी मानवी साखळी करुन पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्हाभरात झालेल्या हानीची माहिती घेतली जात आहे.
कोठे, किती झाला पाऊस...परंडा मंडळात सर्वाधिक १२८ मिमी पाऊस झाला आहे. तर परंडा तालुक्यातील सोनारी १००, अनाळा ९२, आसू ७९, जवळा ७६, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ९२, जळकोट ७२, इटकळ ६९, सलगरा ६५, उमरगा मंडळात ९७, मुळज ८९, डाळिंब ७०, लोहारा तालुक्यातील माकणी ८८, लोहारा मंडहात ७१ तर उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी मंडहात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.