उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर परिषदेत भाजपा सदस्यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे अभय इंगळे उपगराध्यक्ष पदी विराजमान झाले. ही निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थित पार पडली. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. निवडीनंतर इंगळे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद मकरंद राजेनिंबाळकर यांच्या रूपाने शिवसेनेकडे असले तरी सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. असे असतानाही मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची खेळी फसली होती. अधिकृत उमेदवार इंगळे यांना माघार घेण्यास लावून सेनेचे सुरज साळुंके यांना साथ दिली होती. परंतु, मागील अडीच वर्षात त्यांच्याकडून राष्ट्रवादीला पर्यायाने आमदार पाटील यांना अपेक्षित विरोधाची भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व इतर पक्षाचे मिळून जवळपास २५ सदस्यांनी त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव बहुमताने पारित झाल्यानंतर उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार उपनगराध्यक्ष पदी आपलीच वर्णी लागावी यासाठी मूळ भाजपातील योगेश जाधव, आमदार पाटील समर्थक अभय इंगळे, गणेश खोचरे, सेनेतील राजाभाऊ पवार इच्छूक होते.
मंगळवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होताच राजाभाऊ पवार, वंदना शिंदे, अभय इंगळे, योगेश जाधव, गणेश खोचरे, रूपाली असलेकर यांनी फॉर्म घेतले. परंतु, यापैकी राजाभाऊ पवार, गणेश खोचरे आणि अभय इंगळे यांनीच नामनिर्देशन दाखल केले. तर दुसरीकडे मूळ भाजपाच्या सदस्यांची दिशाही स्पष्ट होत नव्हती. योगेश जाधव यांना संधी न दिल्याने भाजपाचे पन्नास टक्के सदस्य गैरहजर राहणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यामुळे भाजपा आमदार पाटील समर्थक तथा राष्ट्रवादीच्या सदस्यांत अस्वस्थता निर्माण झाली होती. यानंतर अभय इंगळे, युवराज नळे, माणिक बनसोडे यांनी गणेश खोचरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच वरिष्ठांशी फोन झाला असता त्यांनी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शविली. यानंतर आ. पाटील समर्थकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, दुसरीकडे सेनेची कोंडी झाली. ज्या भाजपाच्या भरवशावर राजाभाऊ पवार यांनी उमेदवारी दाखल होती, ते सर्वच सदस्य सभागृहात येऊन बसल्याने थोडीबहुज जी आशा होती, तीही मावळली. त्यामुळे सेनेचे पवार आणि आमदार पाटील समर्थक अभय इंगळे यांच्यात सरळ लढत झाली.
यावेळी राजाभाऊ पवार यांना सेनेसोबतच राष्ट्रवादीप्रेमी म्हणून ओळख असलेले प्रदीप घोणे, वंदना शिंदे, भाजपाच्या प्रिया ओव्हाळ आणि काँग्रेसचे दोन सदस्य मिळून १७ मते मिळाली. तर अभय इंगळे यांना २३ मते मिळाली. त्यामुळे पीठासन अधिकारी राजेनिंबाळकर यांनी उपनगराध्यक्ष पदी इंगळे हे विजयी झाल्याचे जाहीर केले. उपनगराध्यक्ष पदाची माळ इंगळे यांच्या गळ्यात पडल्याचे समजताच समर्थकांनी पालिकेच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
कागदोपत्री राष्ट्रवादी, सत्ता भाजपाचीच !नगर परिषदेची निवडणूक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि तुळजापूर मतदार संघातून निवडूनही आले. परंतु, उस्मानाबाद पालिकेतील त्यांचे समर्थक राष्ट्रवादीतच राहिले. राजकीय खेळीचा भाग म्हणून त्यांना भाजपात प्रवेश घेतला नाही. हीच खेळी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत यशस्वी झाल्याचे दिसून आले. अभय इंगळे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे कागदोपत्री हे पद राष्ट्रवादीकडे गेल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्ष सत्ता भाजपाचीच आहे. त्यामुळे भविष्यात ही खेळी शहरामध्ये भाजपा वाढीसाठी पुरक ठरेल, असे बोलले जात आहे.