सुरतगांव शिवारात गोवर्धन बाबूराव गुंड यानी स्वत:च्या शेतात आठ लाख रुपये खर्च करून दोन एकर द्राक्षबागेची सात महिन्यापूर्वी लागवड केली. यासाठी त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सांगवी (काटी) शाखेतून ३ लाखाचे कर्ज घेतले. द्राक्ष झाडाची जोपासना उत्तम प्रकारे करून वेलवर्गीय झाडे पाच फुट उंचीपर्यंत वाढविली. मात्र, या भागात वन्यप्राण्याचा वावर वाढल्याने हरणाच्या कळपाने मंगळवारी पहाटे द्राक्ष झाडावर हल्ला चढवत ८० झाडाची शेंडे, पाने खाऊन फस्त केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सुरत गांव सज्जाचे तलाठी आबा सुरवसे माजी उपसरपंच राम गुंड, आण्णासाहेब गुंड, विजय माने आदी पंचांनी नुकसाग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करून पंचनामा केला. तसेच वन विभागाचे वनपाल राहुल शिंदे यांना वन्यप्राण्याने द्राक्षबागेचे नुकसान केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, वन्यप्राणी फळबागाचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे.
कोट......
द्राक्ष झाडाला फळधारणा होण्यापूर्वीच वन्यप्राणी कोवळ्या झाडाची पाने, शेंडे खाऊन नुकसान करीत आहेत. बाग लागवडीकरीता बँकेचे ३ लाख रूपये कर्ज घेतले. मात्र वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. यासाठी वन विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत करावी, अशी अपेक्षा आहे.
- गोवर्धन गुंड, सुरतगांव