रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर सांगवी (काटी) येथील चौकात दोन्ही बाजूला उंच मनोरे उभारून तिथे पॉवर लॅम्प बसविण्यात आले होते. ते दिवे मधल्या काळात वीज कनेक्शनअभावी बंद होते. गावकरी, रहिवाशांनी पाठपुरावा केल्यानंतर त्या दिव्यांना वीज कनेक्शन चालू करण्यात आले. परंतु, नंतर वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन पॉवर लॅम्प महिन्यापासून बंद पडले आहेत. यामुळे चौकासह आजूबाजूच्या रस्त्यावर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते. रहिवाशांनी दिवे चालू करण्याबाबत टोलनाक्याच्या ठेकेदार प्रतिनिधीला विनंती केली. परंतु, त्यांच्याकडूनही चालढकल होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
महामार्गावर रात्री पडणाऱ्या अंधाराचा फायदा घेत चोरटे साठवण तलावावरील मोटारी चोरून नेत आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस पडणारा अंधार रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे बंद असलेले दिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी विशाल कसबे, मधुकर मगर, शंकर मगर, लक्ष्मण मगर यांनी केली आहे.