भूम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत दुस-या सत्रात मराठी भाषा ऐवजी हिंदी भाषेची प्रश्नपत्रिका दिल्याने विद्यार्थी गडबडून गेले. ही बाब केंद्र संचालकांच्या निदर्शनास आल्यानंतर अर्ध्या तासानंतर मराठी भाषेची प्रश्नपत्रिका दिली. यानंतर परीक्षा पूर्ववत सुरू झाली. तोपर्यंत ब-याच विद्यार्थ्यांनी काहीअंशी पेपर सोडविला होता.
भूम शहरातील रविंद्र हायस्कुलमध्ये १७ नोव्हेंबर रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची दोन सत्रात राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा होती. महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील १२४ विद्यार्थी सदरील परीक्षेसाठी बसले होते. यापैकी १ विद्यार्थी गैरहजर होता. दरम्यान, परीक्षेच नियोजन गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे होते. ‘एसएटी’ हा पेपर दुस-या सत्रात होता. वेळ दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत होती.
परीक्षा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यावर मराठी भाषा माध्यम असे लिहिले होते. परंतु, आतील पाने हिंदी माध्यमाची दिसून आली. १२४ पैकी १०१ प्रश्नपत्रिका हिंदी माध्यमाच्या निघाल्या. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर विद्यार्थ्यांत एकच गोंधळ उडाला. तोवर काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले होते. दरम्यान, यानंतर काही विद्यार्थ्यांनी ही बाब केंद्र संचालक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मराठी माध्यमाच्या उर्वरित २३ प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून उर्वरित विद्यार्थ्यांना वितरित केल्या. त्यामुळे पेपरची वेळ वाढवून देण्यात आली. उपरोक्त प्रकाराबाबत पालकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद केंद्राशी संपर्क साधून कमी पडलेल्या मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वितरित केले. तसेच वेळ वाढवून परीक्षा घेण्यात आली.-आर. टी. भट्टी, केंद्र संचालक.