कळंब शहरात वास्तव्य करणाऱ्या असंख्य व्यक्ती सकाळ, संध्याकाळ ‘वॉक’ साठी घराबाहेर पडतात. यात तांदूळवाडी रोड, परळी रोड, बार्शी रोड, ढोकी रोड आदी रस्त्यावर असा मोकळा श्वास घेण्यासाठी पायपीट करणारांची संख्या मोठी आहे. यापैकीच डिकसळ भागातील एका वसाहतीमध्ये वास्तव्य करणारे आण्णासाहेब बाबासाहेब पिंगळे, ॲड. बाळासाहेब लोमटे, बालाजी गपाट, अशोक जाधव ही मंडळी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नेहमीप्रमाणे फिरायला निघाले.
ही मंडळी ढोकी रस्त्याने डिकसळकडे मार्गस्थ होत असताना राजधानी हॉटेलच्यासमोर अचानक पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने आण्णासाहेब बाबासाहेब पिंगळे यांना उडवले. यावेळी एका क्षणात, काही कळायच्या आत पिंगळे हे उडून दूर अंतरावर कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पुढे चालत असलेले ॲड. लोमटे, जाधव, गपाट हे सहकारी पादचारी बालंबाल बचावले. या अज्ञात वाहन चालक बेदरकारपणे आला अन् पिंगळे यांना उडवून पसार झाला. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे व इतरांनी रुग्णवाहिकेस पाचारण केले होते.
अपघातात मयत झालेले आण्णासाहेब बाबासाहेब पिंगळे (वय ४७) हे मुळचे पाथर्डी (ता. कळंब) येथील रहिवासी असून, हल्ली कळंब शहरालगतच्या डिकसळ हद्दीतील संभाजीनगर भागात वास्तव्य करत आहेत. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काळेगाव (ता. केज ) शाखेत ते कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.