धाराशिव : कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात कर मागे घ्यावा, अशी मागणी करीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी तुळजापुरात कांदा निर्यात कर अध्यादेशाची होळी करून आंदोलन करण्यात आले. यामुळे जुना बसस्थानक चौकात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
तालुका शिवसेनेच्या (उबाठा) वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. राजेनिंबाळकर यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जोरदार निषेध नोंदवित भाजपवर हल्लाबोल केला. ज्यावेळी कांद्याला भाव नव्हता त्यावेळी सरकारने नाफेडतर्फे कांदा खरेदी केली नाही, परंतु आता कांद्याला चांगला भाव येत असताना त्यावर चाळीस टक्के निर्यात कर लावून शेतकऱ्याचा कांदा देशात रोखण्याचे पाप केंद्र सरकार करीत असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका घेत असून, पिकाला मिळालेल्या भावाला पाडण्यासाठी निर्यात कर वाढविला जात आहे. अशा धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. जोपर्यंत ४० टक्के निर्यात कराचा अध्यादेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ‘उद्धव ठाकरे आगे बढो’, ‘शेतकरी विरोधी भाजप सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देऊन परिसरात दणाणून टाकला होता. आंदोलनात तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी, महिला आघाडीच्या शामल वडणे, श्याम पवार, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रतीक रोचकरी, विकास भोसले, अर्जुन साळुंखे, अमीर शेख, चेतन बंडगर, सिद्धनाथ कारभारी, अक्षय ढोबळे, विजय सस्ते आदी सहभागी झाले होते.