बाबुराव चव्हाण, धाराशिव: भरधाव मलावाहू ट्रक दुभाजक क्राॅस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या (विरूद्ध दिशेच्या) ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात एका चालकाचा पाय तुटला आहे. तर दाेन्ही वाहनांचे ‘हेड’ अक्षरश: चक्काचूर झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव शहरातील तेरणा काॅलेजनजिक घडली.
धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग धाराशिव शहरातून जाताे. नगर पालिकेचे जलशुध्दीकरण केंद्र ते जुना उपळा राेड या दरम्यान महामार्गाला तीव्र स्वरूपाचा उतार आहे. त्यामुळे साेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रचंड वेग असताे. अशावेळी नियंत्रण सुटून वा टायर फुटल्याने सातत्याने अपघाती घटना घडत आहेत. अशाच स्वरूपाची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर धाराशिव शहरातील तेरणा काॅलेजच्या समाेर घडली. छत्रपती संभाजीनगरहून साेलापूरकडे निघालेल्या मालवाहू ट्रक तीव्र उताराला लागताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक प्रचंड वेगात असल्याने महामार्गावरील दुभाजक क्राॅस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या दुसऱ्या मालवाहू ट्रकवर आदळला.
अपघात एवढा भीषण हाेता की, दाेन्ही वाहनांचे ‘हेड’ अक्षरश: चक्काचूर झाली आहेत. यामध्ये छत्रपती सभाजीनगरकडे निघालेल्या ट्रकच्या चालकाचा पाय तुटल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तर दुसऱ्या ट्रकचा चालकही जखमी आहे. या दाेघांनाही जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. माहिती मिळताच पाेलिसांनी ‘स्पाॅट’वर दाखल हाेत पंचनामा केला. या प्रकरणी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत गुन्हा नाेंद झालेला नव्हता.
माेठा अनर्थ टळला...
साेलापूरकडेन निघालेला ट्रक प्रचंड वेगात हाेता. नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दुभाजक क्राॅस करून महामार्गाच्या दुसऱ्या लेनवरील ट्रकवर आदळला. समाेर ट्रक नसता तर हे वाहन सर्व्हिस राेडला लागून असलेल्या घरांमध्ये घुसरले असते. आणि अशावेळी माेठी हानी झाली असती.