शासनाने स्त्रीभ्रूणहत्या कायदा अस्तित्वात आणला असला तरी अनेक ठिकाणी अजूनही छुप्या पध्दतीने गर्भपात सुरूच आहेत. येथे एका खाजगी रुग्णालयातून एका विविहितेचा गर्भपात केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ़ कपिलदेव पाटील यांनी पोलीस संरक्षणात या रुग्णालयात छापा टाकला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या पथकाने ज्या महिलेचा गर्भपात झाल्याची माहिती मिळाली, त्या महिलेचीही अंगणवाडी ताईंमार्फत चौकशी केली. यावेळी सदर महिलेने पाय घसरून पडल्यामुळे गर्भपात झाल्याचे सांगितले. त्यामुळे पथकाला कुठलीच कार्यवाही करता आली नाही.
दरम्यान, येथील काही खाजगी रुग्णालयात नेहमीच रात्री-अपरात्री चोरून गर्भपात होत असल्याची चर्चा आहे. दोन महिन्याच्या आतील गर्भपात गोळ्या देऊन करण्यात येत असल्याचे समजते़ त्यामुळे याच्या चौकशीची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.