रिअलिटी चेक
उस्मानाबाद : काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला तरी धाेका अद्याप टळलेला नाही. अशातच तिसऱ्या लाटेचा धाेकाही तज्ज्ञ बाेलून दाखवित आहेत. राज्याच्या अनेक भागात डेल्टा प्लसने डाेके वर काढले आहे. अशा काळात मास्कचा वापर गरजेचा आहे. मात्र, अनेक वाहनधारक ही गरज बेदखल करीत असल्याचे चित्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात मंगळवारी पहावयास मिळाले. दहा वाहनधारकांपैकी जवळपास पाच ते सहा लाेकांच्या ताेंडावर मास्क दिसून आला नाही. तर एक ते दाेन वाहनधारक असे हाेते, ज्यांचे मास्क हनुवटीवर असल्याचे दिसले.
व्यापक स्वरूपात हवी कारवाई...
मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकेका दिवशी दीडशे ते दाेनशे कारवाया करून दंड वसूल केला जात असे. परंतु, सध्या ही गती मंदावली आहे. दिवसाकाठी दहा ते पंधरा कारवाया हाेतात. काेराेनाचा संसर्ग ओसरल्याचे सांगत अनेकजण मास्क वापरणे टाळत आहेत. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कारवाईचे स्वरूप अधिक व्यापक केले पाहिजे.
मास्क ताेंडाखाली...
काेराेनाचा धाेका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत मास्क, सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. परंतु, त्याचा फारसा परिणाम हाेत नसल्याचे दिसून आले. अनेक अधिकाऱ्यांच्याच ताेंडावर मास्क नव्हता. तर काहींच्या हनुवटीवर मास्क दिसून आला. यात काही पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता, हे विशेष.
फिजिकल डिस्टन्सिंगचाही विसर...
एकीकडे मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष हाेत असतानाच दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी वावरताना फिजिकल डिस्टन्सिंगही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसले. छत्रपती शिवाजी महाराज चाैकातील अनेक दुकानांसमाेर गर्दी नजरेस पडली. या गर्दीला वेळीच आवर न घातल्यास तिसरी लाट व डेल्टा प्लससारख्या संकटाला ताेंड द्यावे लागेल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ बाेलून दाखवित आहेत.