मुरुम मंडलात यंदा जवळपास दोन हजार ५०० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. मागीलवर्षी चांगला पाऊस पडल्याने उसाचे क्षेत्रही बऱ्यापैकी वाढले आहे. शहर व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीस आला आहे. वर्षभर काबाडकष्ट करून उसाचे पीक शेतकऱ्यांनी कसेबसे जगवले होते. पण सोमवारी व मंगळवारी रात्री पडलेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस आडवा झाल्याने उसाला उंदीर लागणार आहे. शिवाय तोडणीचा खर्चही अधिक लागणार असून वजनही घटणार आहे. वादळामुळे उसाचे फड आडवा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे.
केसरजवळगा (ता. उमरगा) येथील शेतकरी संदीप आप्पाराव पाटील यांचा तोडणीस आलेला दोन एकरामधील उसाचा फड आडवा झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी तीन एकरामध्ये उसाची लागवड केली होती. वादळी पावसात या उसाचे नुकसान झाले आहे.