शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सामाजिक कार्यकर्तेे किरण पाटील यांनी गेल्या जून महिन्यापासून सार्वजिक ठिकाणी वृक्षलागवड करून झाडांना लोखंडी कुंपणासह नियमित आठ दिवसांला घागरीने पाणी देत जवळपास शंभर झाडांची जोपासणा केली आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनानमार्फत दर वर्षी जून महिन्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हजारो वृक्षांची वृक्षांची लागवड केली जाते. परंतु, यातील बहुतांश झाडांची जोपासणा होत नाही, हे वास्तव आहे. परंतु, शिराढोण येथील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी मागील वर्षी जून महिन्यामध्ये वृक्षलागवडीस प्रारंभ केला असून, यामध्ये वड, पिंपळ, बेल, नांदुरकी अशा वातावरणामध्ये हजारो टन ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षांची निवड करून लागवड केली. यासाठी दोन बाय दोन खड्डा घेऊन त्यात काळी मातीसोबत शेण, कुजणारा काडी, कस्पट याचे मिश्रण टाकले. संरक्षणासाठी या प्रत्येक झाडाला त्यांनी लोखंडी जाळी बसवली आहे. दर आठ दिवसांला ते घागरीने प्रत्येक झाडाला पाणी देत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने झाडाच्या बुडाला ओल टाकून ठेवण्यासाठी त्यांनी भुसकट टाकलेले आहे. यामुळे दहा महिन्यांमध्ये वृक्षांची उंची चार ते पाच फूट वाढली आहे.
किरण पाटील यांनी ढोरी नदीच्या जलसंधारणासाठीही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना गट-तट बाजूला ठेवून संघटित केले होते.
चौकट........
येथे केली लागवड
पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा, रस्ता, ग्रामपंचायत, टेलिफोन कार्यलय, स्मशानभूमी परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी या वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये वड, पिंपळ, बेल, नांदुरकी आदी वृक्षांचा समावेश आहे. सध्या कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व समोर आले असून, या वृक्षापासून हजारो टन ऑक्सिजन मिळणार आहे. शिवाय, या झांडांची उंची मोठी होणार असल्याने उन्हाळ्यात सावली आणि पक्ष्यांनादेखील मोठा आधार उपलब्ध होणार आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, अधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते झाड लावून त्यांचेही वाढदिवस साजरे केले आहेत.