उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील जिल्हा परिषदेचे आरोग्य उपकेंद्र केवळ नावालाच अस्तित्वात आहे़ या उपकेंद्रात कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी आज आरोग्य केंद्रासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे़
तालुक्यातील करंजकल्ला गावातील नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य उपकेंद्र कार्यरत करण्यात आले़ मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या या केंद्रात पूर्णवेळ आरोग्यसेविका व आरोग्यसेवक कार्यरत नाहीत़ त्यामुळे या उपकेंद्राचा गावातील रूग्णांना कोणताच लाभ होत नाही़ केवळ भौतिकदृष्ट्या इमारत उभी आहे.
यामुळे हे उपकेंद्र आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत असलेल्या ग्रामस्थांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे ठरत आहे. यामुळे संतप्त युवकांनी कळंब येथील गट विकास अधिकारी यांना निवेदन देवून दिनांक १ आॅक्टोबरपर्यंत याठिकाणी कर्मचारी नेमावा, अशी मागणी केली होती. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त युवकांनी गुरूवारी बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ या उपोषणात ग्राप सदस्य दिनेश सुकुमार पवार, दत्तात्रय बळीराम पवार, अनिल दत्तात्रय पवार, सागर पवार, उमेश कवडे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत़