उस्मानाबाद : डोक्यात लाकडाने वार करून पतीचा खून केल्यानंतर ती आत्महत्या भासविणाऱ्या पत्नीला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील वाडीबामणी येथे सप्टेंबर २०१६ मध्ये घडली होती.
याप्रकरणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी की, वाडीबामणी येथील सुभाष देवाप्पा लईतबार यांनी शेतातील नापिकी तसेच देण्या-पाण्यामुळे हतबल होवून आत्महत्या केल्याची फिर्याद २२ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांचे पुतणे पप्पू लईतबार यांनी बेंबळी पोलिस ठाण्यात दिली होती. यावरून अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली होती. परंतु, या आत्महत्योच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असता मयताच्या दोन्ही कानातून रक्त आल्याचे दिसून आले. शिवाय, गळफास घेऊन आत्महत्याच्या केल्याच्या अनुषंगाने कुठलाही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. शवविच्छेदनातही मयताच्या कवटीला व मेंदुला तसेच कानाच्या दोन्ही बाजुंनी मृत्यूपूर्वीच्या जखमा दिसून आल्या. त्यामुळे याप्रकरणी पोहेकॉ एच. सी. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून परत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास सपोनि दांडगे यांनी केला. यादरम्यान त्यांना घटनेच्या वेळी मयत व त्याची पत्नी हे दोघेच घरी होते, अशी माहिती मिळाली. तसेच मयत व त्याच्या पत्नीमध्ये दुसऱ्याची शेती बटईने करण्याच्या कारणावरून सतत वाद होत होते. घटनेच्या दिवशी मयताची पत्नी मंगल सुभाष लईतबार हिने पती सुभाष लईतबार यांच्या डोक्यात लाकडाने वार करून खून केला व नंतर पतीचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचे भासविले, अशी माहिती तपासातून पुढे आली. सदर प्रकरणाची सुनावणी येथील सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयासमोर झाली. न्या. देशपांडे यांनी सदर प्रकरणात न्यायालयासमोर आलेल्या साक्षी, पुरावे तसेच युक्तीवाद, ग्राह्य धरून मंगल लईतबार हिला दोषी ठरविले. तिला जन्मठेप व ५०० रुपये दंड तर कलम २०१ नुसार ३ वर्ष सक्त मजुरी व ५००रुपये दंड ठोठावला.