धाराशिव -अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसाेबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी हवालदिल हाेऊ नये. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मीही शेतकरी कुटुंताबातीलच आहे. मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा शब्दात धीर देतानाच नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टाेलाही लगावला.
धाराशिव जिल्ह्यात सलग दाेन दिवस अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी जिल्ह्यात आले हाेते. माेर्डा व वाडीबामणी या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जावू नये. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही टाेला लगावला. मी शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने आपल्या वेदना मला कळतात. त्यामुळेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलाे आहे. नुकसान प्रचंड झाले आहे. नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला आमचे सरकार वाऱ्यावर साेडणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. त्यांच्यासमवेत पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आदी उपस्थित हाेते.
श्री रामाकडे आमच्यासाठी काहीही मागितले नाही...काल-परवाच आम्ही आयाेध्येत जावून आलाे. राज्यातील बळीराजावरील संकट दूर हाेवू दे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा संकटातून सावरण्याचे बळ मिळू दे, एवढेच श्री रामाकडे मागितले आहे. आमच्यासाठी काहीही मागितले नाही, असा टाेलाही त्यांनी विराेधकांना लगावला.
उध्दव ठाकरेंकडून १०० टक्के राजकारण...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व हाेते. परंतु, माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचाराचाच नव्हे तर तत्वाचाही विसर पडला आहे. ते आता १०० टक्के राजकारण करीत आहेत. पत्रकार परिषदेनंतर त्यांना शेतकर्यांबाबत विचारले असता, ‘नमस्कार’ करून उठून गेले. यावरूनच शेतकर्याबाबतची त्यांची तळमळ दिसून येते, असा चिमटाही काढला.