उस्मानाबाद : सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला गेला आहे. राजकारणात असे प्रकार घडतातच. मात्र, कुटूंबियांना त्रास देण्याचे प्रकार आता सुरु झाल्याचा दावा करीत मृद व जलसंधारण मंत्री शंकररराव गडाख यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन मार्ग काढतील, अशी अपेक्षा सोमवारी उस्मानाबादेत व्यक्त केली.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेण्याच्या मुद्यास त्यांनी सहमती दर्शविली नाही. ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भावना मनमोकळ्यापणे मांडल्या आहेत. ज्यांना-ज्यांना असा त्रास होतोय, ते लोक आता बोलत आहेत. अलिकडे तपास यंत्रणांचा वापर करुन कुटूंबियांना त्रास दिला जात आहे. मलाही त्रास दिला गेला. आमदार नसताना एका शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यात न्यायालयाच्या तारखेची नोटीस मिळाली नव्हती. त्यामुळे हजर राहता आले नाही. तेव्हा मोठा फौजफाटा घरी पाठवून धाड टाकण्यात आली. तेव्हा गृहमंत्रीपद भाजपकडे होते.
तिन्ही पक्षांचे नेते मार्ग काढतील
महाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होणारा त्रास थांबविण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली. या अपेक्षेद्वारे आ. सरनाईकांच्या पत्रातील भावनेला समर्थन देतानाच राजकारणात हे चालच असते, असे सांगत जुळवून घेण्याच्या मुद्यास मात्र गडाख यांनी असहमती दर्शविली.