उस्मानाबाद : अनेकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी इतिहास घडविला, त्यांचीच स्मारके उभी राहिली. त्यामुळे जगावं तर असं की इतिहासाने माझ्यासाठी पान राखावे, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,उस्मानाबाद विभागीय केंद्र व येथील रा. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष जीवनराव गोरे तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. रमेश दापके, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, सुरेखा जगदाळे, सुरेखा जाधव आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात जीवनराव गोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे व सुशीलादेवी साळुंके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक उपाध्यक्ष डॉ. जयसिंगराव देशमुख, सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैभव आगळे यांनी केले. सचिव बालाजी तांबे यांनी आभार मानले.