कळंब : एकतर अनेक शेतकरी मोबाईल वापरत नाहीत, वापरायचा म्हटला तर मोबाईल घ्यायची ऐपत नाही. त्यात घेतलाच तर ॲप धड चालत नाही अन् ते चालले तर चांगली रेंज मिळत नाही. यास्थितीत ई-पीक पाहणी करायची कशी, असा सवाल करत छावा संघटनेने ‘ऑफलाइन’ पाहणीची मागणी केली आहे.
कळंब तालुक्यात सध्या खरीप हंगाम बहरात आला आहे. यास्थितीत दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी होऊन त्यांची नोंद सातबारावरील नमुना नंबर १२ वर येत असते. यंदा मात्र अशा नोंदीसाठी ‘ई पीक पाहणी’ हा हायटेक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात दस्तुरखुद्द शेतकऱ्यांनाच थेट आपल्या वावरातून पिकांची नोंद करावी लागणार आहे. त्यासाठी दिलेल्या १५ सप्टेंबर या अंतिम तिथीपर्यंत मोजक्याच शेतकऱ्यांनी यास प्रतिसाद दिल्याने ३० तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आपल्या शेतामधील उभ्या पिकात उभे राहून ऑनलाईन पिकांची माहिती व फोटो अपलोड करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.
यामुळे एकीकडे गावपातळीवर महसूल विभागाचे तलाठी यासाठी शेतकऱ्यांकडे आग्रह करत असले तरी यासंबंधीच्या प्रगतीचा घोषवारा मात्र धिम्यागतीने वृद्धिंगत होत आहे. त्यास तांत्रिक अडचणीच कारणीभूत ठरत असल्याचा सूर गावोगावी कानी पडत आहे. यासंदर्भात छावा संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची मोबाईल घ्यायची ऐपत नाही, घेतला तर वापरता येण शक्य नाही. त्यात रेंज मिळत नसल्याची व ॲप चालत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप पिकांची पाहणी ऑफलाइन करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावर ‘छावा’चे मराठवाडा अध्यक्ष वसुदेव पाचंगे, तालुका सरचिटणीस लक्ष्मण लोमटे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष वैभव जाधव, संग्राम मुंडे, अभिषेक माने, विशाल शेळके, अजीत लांडगे, रवी शेळके, लक्ष्मण कोठावळे, दीपक कोठावळे, गहिनीनाथ पाटील, नवनाथ तवले, शक्ती गायकवाड नरसिंग लोमटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.