उस्मानाबाद : अनेक जण कामाहून घरी आल्यानंतर टीव्हीसमोर काहीतरी खात बसतात. तसेच मोबाईल पाहत जेवण करीत असतात. मात्र, ही सवय आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे समोर येत असून, जेवताना एकाग्रता नसल्याने पोटाचे विकार वाढण्याची भीती पोटविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना काळात अनेक व्यक्ती घरातच बसून आहेत. अनेकांचे बाहेर फिरणे तसेच व्यायाम बंद झाला आहे. घरातच बसून असल्याने विरंगुळा म्हणून ज्येष्ठासह लहान मुले, प्रौढ व्यक्ती तासनतास टीव्हीसमोर किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असतात. अनेकांना जेवणाची भ्रांत राहत नाही. टीव्हीसमोर बसूनच किंवा हातात मोबाईल घेऊन जेवण करीत असतात. मात्र, सतत टीव्ही, मोबाईलमध्ये लक्ष घालून जेवण्यामुळे मनाची एकाग्रता राहत नसल्याने पचनक्रिया सुरळीत होत नाही. परिणामी, पोटाचे विकार जडत आहेत. सध्या अनेक रुग्ण हे अपचन होत असल्याने रुग्णालयात उपचारास येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी शांतपणे जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पोटविकाराची कारणे...
टीव्ही पाहत जेवण करणे, मोबाईल मध्ये लक्ष घालून जेवण, फास्टफूडचे सेवन करणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे, शिळे अन्न खाणे, अशुद्ध पाणी पिणे, व्यसन, अस्वच्छता, पुरेशी झोप नसणे आदी पोटविकाराची कारणे आहेत.
पोटविकार टाळायची असतील तर...
वेळेवर जेवण करणे,
सकस आहार घेणे,
जेवणात एकाग्रता ठेवणे,
उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळणे,
प्रतिक्रिया...
वारंवार टीव्हीसमोर बसून जेवण करणे आरोग्यावर परिणाम करणारे आहे. जेवताना मन एकाग्र असणे गरजेचे असते. मात्र, टीव्ही पाहत असल्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाचनक्रिया बिघडते. त्यामुळे अन्य समस्याही उद्भवू लागतात.
डॉ. एन.बी. गोसावी, पोटविकार तज्ज्ञ
बाहेरचे खाणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे, तसेच दूषित पाण्यामुळे पोटविकाराच्या समस्या उद्भवत असतात. टीव्हीसमोर जेवत बसल्याने एकाग्रता कमी होते. वय व तब्येतीनुसार शरीरास पोषण तत्त्व मिळत नाहीत. त्यामुळे पोटाचे आजार वाढतात. अपचन, ॲसिडीटी असा त्रास असणारे रुग्ण उपचारास येत आहेत.
डॉ. अशिष काळे, पोटविकार तज्ज्ञ
मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही
शाळा बंद असल्यामुळे मुले घरातच आहेत. घरातही टीव्ही समोर बसून असतात. टीव्ही पाहिल्याशिवाय मुले जेवणच करीत नसल्याने टीव्ही लावावी लागते.
नौशादबी शेख, गृहिणी
कोरोनामुळे सर्वच बंद हाते. त्यामुळे मुलांना घराबाहेर घेऊन जाणे धोक्याचे होते. मुले घरात मोबाईल व टीव्ही पाहत बसत आहेत. त्यामुळे त्यांचे जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. जेवतानाही टीव्ही व मोबाईलमध्येच लक्ष असते.
सुवर्णा बनसाडे, गृहिणी
मागील दीड वर्षापासून कोरोनाचे लॉकडाऊन व अनलॉकच असते. त्यामुळे नागरिकांना घरातच बसावे लागते. विरंगुळा म्हणून कुटुंबातील सदस्य मोबाईल व टीव्हीत पाहत आहेत. जेवतानाही टीव्ही पाहत जेवत करीत असतात.
रेश्मा ऐडके, गृहिणी