धाराशिव : शेतीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी केलेले ४ लाखांचे कंपाऊंड तोडून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण करत १ कोटींची खंडणी मागितल्याची घटना तेरखेडा शिवारात घडली आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून २७ मार्च रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात २० हून अधिक जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील शेतकरी माणिकचंद चंदुलाल बोराणा (७६) यांची तेरखेडा शिवारात २५ एकर शेतजमीन आहे. ही जमीन गावातीलच शांतीलिंग कुंभार व इतरांनी बनावट दस्तऐवजाद्वारे आपल्या नावे करून घेतली होती. या प्रकरणात खंडपीठाच्या आदेशाने धाराशिवच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, आरोपींनी केलेली अतिक्रमणे जानेवारी महिन्यात पोलिस संरक्षणात काढून टाकली होती. यानंतरही सातत्याने अतिक्रमणे होत असल्यामुळे पोलिस संरक्षणात बोराणा यांनी २४ ते २६ मार्च या कालावधीत शेतीला संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू केले. हे समजताच ९ जणांनी रात्री साडेदहा वाजता शेतात जाऊन बोराणा यांना काठी, कुऱ्हाडीने मारहाण केली.
हा प्रकार त्यांनी मुलाला सांगितल्यानंतर आणखी सुमारे १३ जण तेथे दाखल झाले व त्यांनी संरक्षक भिंत पाडून ४ लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच ७० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरून नेले. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी कामात व्यत्यय आणून शेती करायची असेल तर १ कोटी रुपये खंडणी दे, असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे माणिकचंद बोराणा यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शांतीलिंग कुंभार, गौतम कुंभार, रंगनाथ कुंभार, संतोष कुंभार, रमेश कुंभार, विनोद कुंभार, प्रीतिश कुंभार, किशोर कुंभार यांच्यासह इतर १० ते १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.