लोहारा : तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनाने मागील दोन दिवसांत दोन ठिकाणी कारवाई केली. यावेळी दोन जेसीबी व सहा ट्रॅक्टर ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील तावशीगड व अचलेर येथे गेले दोन दिवसांत महसूल प्रशासनाने ही कारवाई केली. तावशीगड येथील सरकारी गायरान जमिनीतील अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून त्याची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तलाठी सचिन फड, किशोर पवार यांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी जेसीबीद्वारे उत्खनन करून व दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने ही वाहने ताब्यात घेतली.
तसेच अचलेर येथील साठवण तलावांमध्ये अवैधरित्या उत्खनन करणारे एक जेसीबी व चार ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मुरूम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या सर्वांना दंडात्मक नोटिसा देऊन वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात एकूण २१ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसीलदार रोहन काळे यांनी सांगितले.
चौकट........
रात्री-अपरात्री वाळूची वाहतूक
तालुक्यात विशेषत: लोहारा, जेवळी, माकणी, सास्तूर, कानेगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन केले जाते. तसेच प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी वाळू माफियांकडून सुटीच्या दिवशी तसेच रात्री-अपरात्री वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने अशा वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारून अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.