उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार झाले. अशा घटना राेखण्यासाठी शक्ती कायद्याला तत्काळ मूर्त स्वरूप द्यावे, अशी मागणी भाजपा युवा माेर्चाच्यावतीने करण्यात आली.
पुणे, पेन, रायगड येथील बलात्काराच्या आरोपाखाली तुरुगांत शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर सुटका झालेल्या आरोपीने ३ वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. त्याचबरोबर औरंगाबाद येथेही नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली; परंतु त्या संशयिताची अजून कुठल्याही प्रकारची चाैकशी केली गेली नाही. या दुर्देैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. राज्यातील ठाकरे सरकारने गाजावाजा करत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ हा कायदा पुढे आणला; परंतु याची अंमलबजावणी करण्यास हे सरकार कुचकामी ठरत आहे. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना स्वत:च्या पक्षाविरुद्ध तसेच सरकारविरुद्ध प्रसिद्धपत्र काढण्याची वेळ आल्याचा आराेपही युवा माेर्चाच्यावतीने करण्यात आला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता सरकारने शक्ती कायद्यास तत्काळ मूर्त स्वरूप द्यावे, अशी मागणी भाजपा युवा माेर्चाकडून करण्यात आली. यावेळी गजानन नलावडे, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, सुजित साळुंके, प्रीतम मुंडे, सचिन लोढे, सुनील पंगुडवाले, राहुल शिंदे, सुरज शेरकर, गणेश इंगळगी, शरीफ शेख, भगवंत गुंड, शंकर मोरे, पूजा राठोड, मिताली राऊत, प्रसाद मुंडे, अक्षय किशोर विंचुरे, शेख नसरोद्दीन मैनोद्दीन आदी उपस्थित हाेते.