भूम/धाराशिव : मारहाण व पैशासाठीच्या जाचास कंटाळून भूम शहरातील एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या माेबाइलमध्ये व्हिडीओ रेकाॅर्ड करून राहत्या घराच्या जिन्यात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादाक घटना बुधवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येस जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नाेंदवावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी मृतदेह थेट पाेलिस ठाण्यासमाेर ठेवला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण हाेते. अखेर पाेलिसांनी सुरेश कांबळेंसह आठ ते नऊ जणांविरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
फैयाज दाऊद पठाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वत:च्या माेबाइलमध्ये व्हिडीओ रेकाॅर्ड केला आहे. त्यानुसार २० जून राेजी सुरेश कांबळेंसह इतरांनी मारहाण करून धमकी दिल्याचा उल्लेख आहे. यानंतर मयत फैयाज कुटुंबीयांसह भूम ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, कारमधून चार ते पाचजण तिथे आले. आमच्याविरुद्ध तक्रार दिली तर तुमचे काही खरे नाही, अशा शब्दात धमकी दिली. घाबरून पठाण कुटुंबीय घराकडे परतले. रात्रीच्या जेवणानंतर कुटुंबीय झाेपेत असता, फैयाजने घराच्या जिन्यावरील पत्र्याच्या लाेखंडी आडूला नायलाॅन दाेरीने गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना पहाटे ५ वाजता उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी मयत फैयाजचा मृतदेह पाेलिस ठाण्याच्या आवारात ठेवला. फैयाजच्या आत्महत्येस जबाबदार लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण हाेते. अखेर दुपारच्या सुमारास सुरेश कांबळेसह शिवदत्त डाेके, सचिन येवते (रा.भूम), नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी (रा. बार्शी, जि. साेलापूर) आणि अनोळखी दाेन ते तीन जणांविरुद्ध कलम ३०६ अन्वये भूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आराेपींच्या शाेधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली. यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.