धाराशिव : प्रशासनाने सुरू केलेल्या ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ या उपक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून जिल्ह्यातील ३०८ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. याचा ९ हजार ७०७ शेतकऱ्यांना लाभ झाला.
कृषी विकासात शेतरस्त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला. या योजनेमध्ये गाव पातळीवरील शेतकरी, सरपंच, तंटामुक्ती समिती, मंडळ अधिकारी, बीट जमादार, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि कोतवाल यांच्या मार्फत अतिक्रमित शेतरस्ते मोकळे करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले होते. यामध्ये धाराशिव तालुक्यातील ७१, तुळजापुरातील ५७, उमरगा ३६, लोहारा २३, भूम ३५, परंडा २९, कळंब ३३ आणि वाशी तालुक्यातील २४ असे एकूण ३०८ शेतरस्ते ज्यांची एकूण लांबी ३३४.६१ किमी असून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त केल्यामुळे लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ७०७ आहे.
दरम्यान, अद्यापही काही प्रकरणात शेतरस्ता खुला करण्याबाबत आदेश पारित असतील परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही अथवा नव्याने शेतरस्ता पाहिजे असल्यास अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.