धाराशिव : महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रातील नागरिकांना विकत घ्यावी लागत असल्याचा दावाही पक्षाकडून करण्यात आला आहे. महावितरणकडून लॉकडाऊन काळात १ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे देशातील सर्वात महागडी वीज राज्यात मिळत आहे. असे असतानाही वीज कंपन्याकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरवाढीच्या प्रस्तावास विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दिल्ली सरकार मागील आठ वर्षापासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्तीचा वापर करणाऱ्यांनाही कमी दराज वीजपुरवठा करीत आहे.
तसेच पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेले सरकारही घरगुती व शेतकऱ्यांसाठी ३०० युनिट वीज मोफत देत आहे. इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही, असा असाल आपचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी केला. राज्यात १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात १० ते २० टक्के अधिभार लावून वाढ केली ती त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी पक्षाचे राज्य समिती सदस्य सरपंच ॲड.अजित खोत यांनी केली. आंदोलनात मुन्ना शेख, आकाश कावळे, तानाजी पिंपळे, राजपाल देशमुख, बिलाल रजवी, दत्ता कांबळे आदी सहभागी झाले होते.