परंडा : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील मोदी सरकार खोट्या केसेस करून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत या कारवाईच्या निषेधार्थ तालुका व शहर काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज दुपारी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे परंडा-बार्शी मार्गावर तासभर वाहतूककोंडी झाली होती.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मोदी सरकार महाघोटाळा करणाऱ्या अदानीला वाचवत असून, राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच देशातील जनतेचे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारू नयेत, यासाठी त्यांची खासदारकी रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ॲड. नुरुद्दीन चौधरी यांनी यावेळी केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. हनुमंत वाघमोडे, शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष मेघराज पाटील, कालिदास खैरे, जिल्हा काँग्रेसचे सदस्य श्रीकांत भालेराव, सचिव नितीन गाढवे, सचिव ॲड. रवींद्र सोनवणे, काँग्रेस कार्याध्यक्ष अजय खरसडे, शहराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, तालुका उपाध्यक्ष जयसिंग बिडवे, ओबीसी अध्यक्ष महावीर इतापे, सदानंद बोंबलट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.