तेर : धाराशिव तालुक्यातील तेर येथील रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालयात आता बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूंचेही जतन व संवर्धन केले जाणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पुरातन व ऐतिहासिक संकलेश्वर (बाराखांबी) परिसरात पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातील ११८ मूर्ती, शिलालेख यासह विविध ऐतिहासिक वस्तू तेर येथील संग्रहालयात ठेवण्यासाठी मंगळवारी व बुधवारी दाखल झाल्या. त्यामुळे येथील संग्रहालयात आणखी ऐतिहासिक वारशाची भर पडली आहे.
तेर येथील संग्रहालयात प्राचीन ऐतिहासिक वस्तूंचा वारसा जतन करण्यात येत आहे. या वस्तू पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील अभ्यासक येत असतात. येथे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वस्तू आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाने सात वर्षांपूर्वी उत्खनन केले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रंगशिला, द्वारशिल्प, मुख भाग आणि मंदिराचा अंतराळ यासह अनेक देवी- देवतांच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्यापैकी ८० मूर्ती चांगल्या स्थितीत तर काहींची मोडतोड झाल्याचे दिसून आले. या मूर्ती सात वर्षांपासून तेथेच पडून होत्या. ऊन, पाऊस, वारा पाऊस यामुळे मूर्तींची झीज होत होती. ही बाब लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तेर येथील संग्रहालयात ठेवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. वरिष्ठांच्या परवानगीनंतर मंगळवारी रात्री उशिरा ट्रकमधून या मूर्ती तेरमध्ये दाखल झाल्या. या मूर्ती खूप मोठ्या असल्याने क्रेनच्या साह्याने उतरविण्यात आल्या. पुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत अंबाजोगाई येथून या मूर्ती आणण्याचे काम सुरूच होते.
अधिक लक्ष दिले जाईल या वारशाचे जतन, संवर्धन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळेच तो तेर येथील संग्रहालयात आणण्यात आला. याचे जतन, संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक लक्ष दिले जाईल.- अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग